अंबाजोगाई/ प्रतिनिधी: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुपालन व्यवसायासमोर सध्या नवे संकट उभे ठाकले आहे. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये नियुक्त असलेले अनेक पशुधन विकास अधिकारी मुख्यालयी न थांबता खाजगी प्रॅक्टिसमध्येच जास्त रस दाखवत असल्याचे चित्र अंबाजोगाई तालुक्यासह परिसरात पाहायला मिळत आहे. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने पशुधनाचे नुकसान होत असून गरीब पशुपालकांना खाजगी डॉक्टरांच्या महागड्या फीचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

शासनाकडून भरघोस पगार आणि सोयीसुविधा घेऊनही अनेक डॉक्टर केवळ कागदोपत्री आपली सेवा बजावत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील दवाखान्यांत ठराविक वेळेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरांना पाचारण करावे लागते. धक्कादायक बाब म्हणजे, अनेकदा शासकीय डॉक्टर्स स्वतःच्या कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर राहून खाजगी दवाखाने चालवणे किंवा ‘कॉल’वर जाऊन खाजगी प्रॅक्टिस करण्यालाच प्राधान्य देत आहेत. याकडे तालुका पशुधन अधिकारी यांची दुर्लक्ष होत आहे.

पशुपालकांची आर्थिक लूट

दुभत्या जनावरांना किंवा इतर पशुधनाला अचानक आजार झाल्यास शासकीय सेवा मिळणे कठीण झाले आहे. खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे शुल्क अवाढव्य असून औषधांच्या नावाखालीही मोठी वसुली केली जात आहे. एकीकडे लम्पी सारख्या आजारांचे संकट घोंगावत असताना, दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या या उदासीनतेमुळे पशुपालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुख्यालयी न थांबणाऱ्या आणि खाजगी प्रॅक्टिसमध्ये मग्न असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.