अंबाजोगाई/प्रतिनिधी:
तालुक्यातील केंद्रेवाडी येथील सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कै. बाळासाहेब केंद्रे यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाई येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन शोकाकुल केंद्रे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
बाळासाहेब केंद्रे यांच्या आकस्मिक निधनाने पक्षाने एक सच्चा, तळमळीचा व जनसंपर्क असलेला कार्यकर्ता गमावला असून केंद्रे परिवारावर मोठा आघात झाला आहे. भेटीदरम्यान मंत्री पंकजाताई मुंडे यांनी बाळासाहेब केंद्रे यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले आणि या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी धीर दिला. तसेच केंद्रे परिवाराच्या पाठीशी आपण आणि पक्ष खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी कै. बाळासाहेब केंद्रे यांच्या समाजकार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
