अंबाजोगाई: रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, सुग्गाव येथील सहशिक्षक शेख इरफान शेख करीम यांना जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान आणि प्रशासकीय कामकाजातील तत्परतेची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता, योगेश्वरी महाविद्यालयातील नागपूरकर सभागृह येथे आयोजित समारंभात होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत तथा शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते इरफान शेख यांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल. या निवडीबद्दल शिक्षक वर्ग, सुगाव शाळा परिवार आणि शिक्षण वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत मोलाची भूमिका:


दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अत्यंत संवेदनशील व जबाबदारीच्या काळात कस्टोडियन (अभिरक्षक) कार्यालयात इरफान शेख सरांनी बजावलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखणे, वेळेवर अचूक वितरण करणे व परीक्षेत येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र संचालकांना मदत करणे असा हातखंडा त्यांच्याकडे आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुरक्षित पार पाडण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या या कर्तव्यदक्ष सेवेचे विशेष कौतुक होत आहे.