परळी/प्रतिनिधी: शहरातील एका नामांकित एजन्सीमधून सिगारेटच्या पाकिटांवर अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीचा सिगारेटचा बॉक्स चोरीला गेला असून, याप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील मॅनेजरच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी येथील प्रेम प्रज्ञा नगर भागात ‘श्री वैजनाथ एजन्सी’ (सिगारेट) आहे. २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानात हात साफ केला. चोरट्यांनी आयटीसी (ITC) कंपनीच्या ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटची १ हजार पाकिटे असलेला मोठा बॉक्स लंपास केला. प्रति पाकीट २४० रुपये प्रमाणे एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी दुकानाचे मॅनेजर श्रीधर किशनराव शेप (वय ५६ वर्षे, रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा सिगारेटच्या महागड्या पाकिटांवर असा डल्ला मारल्याने व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मस्के करत आहेत.