गौतम बचुटे/केज : तालुक्यातील कुंबेफळ येथे सुरू असलेल्या अवैध तीर्रट जुगार अड्ड्यावर युसुफ वडगाव पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी 6 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून एक जण पळून गेला आहे. या ठिकाणाहून थार गाडी आणि आयफोनसह एकूण 24 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कुंबेफळ येथे किशोर जाधव यांच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या शेजारी तीर्रट नावाचा जुगार सुरू आहे. माहिती मिळताच सपोनि मांजरमे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल केशव खाडे, कॉन्स्टेबल कोकाटे, पठाण, गृहरक्षक दलाचे जवान आणि दोन पंच यांच्या पथकाने दि. 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी अमोल मनोहर थोरात, सागर गुलाब थोरात, दिनेश राजेभाऊ थोरात, महेश सुभाष थोरात, सुनिल श्रीधर थोरात आणि विष्णु रामकिशन थोरात (सर्व रा. ढाकेफळ, ता. केज) यांना ताब्यात घेतले, तर भरत विश्वंबर थोरात हा पळून गेला. पोलिसांनी आरोपींकडून 21 हजार 500 रुपये रोख, एक आयफोन व मोबाईल, एक महिंद्रा थार गाडी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 25 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सादेक आत्तार यांच्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल केशव खाडे करत आहेत.
