केज/गौतम बचुटे:
केज तालुक्यातील तरनळी येथील तांदळे वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या षटकोनी शाळेची इमारत कोसळून जमीनदोस्त झाली आहे. गुरुवारी (दि. 18) रात्री झालेल्या हलक्या पावसात ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
ही शाळा लव्हुरी केंद्राअंतर्गत येणारी घटक शाळा आहे. या ठिकाणी तांदळे वस्तीवरील सुमारे 18 चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते. शाळेचे छत गळत होते, पावसाचे पाणी वर्गात ठिबकत होते, त्यामुळे ही इमारत अत्यंत धोकेदायक बनली होती. या धोकादायक इमारतीबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि महसूल विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“या वस्ती शाळेच्या इमारतीचे छत गळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती, त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली होती.”
- सुनील केंद्रे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
“आम्ही या धोकेदायक इमारतीबाबत गेल्या दहा वर्षांपासून सांगत आहोत. पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करून गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा.”
- चांगदेव सानप, नागरिक, तांदळे वस्ती
या घटनेमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
