अंबाजोगाई (प्रतिनिधी):
तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक संजय बाबुराव वसव (वय ४७ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.२५) रात्री १ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास संजय वसव यांच्या छातीत अचानक दुखू लागले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात (शासकीय रुग्णालय) उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान मध्यरात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पाटोदा येथील ‘विशाल टेलर्स’ तसेच ‘आराध्या ट्रॅव्हल्स’चे संचालक म्हणून संजय वसव यांनी पंचक्रोशीत आपली ओळख निर्माण केली होती. आपल्या मनमिळाऊ, शांत आणि संवेदनशील स्वभावामुळे ते पाटोदा, ममदापूर, देवळा आणि अंबाजोगाई परिसरात सर्वांच्या परिचयाचे व स्नेहाचे होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण ममदापूर व देवळा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने एका कर्तृत्ववान व मितभाषी व्यक्तीला मुकल्याची भावना परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.