गौतम बचुटे/केज :-
तालुक्यातील बोबडेवाडी येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी (दि. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मयत विद्यार्थ्याचे नाव आकाश नितीन बोबडे (वय १६, रा. बोबडेवाडी) असे आहे. तो गोटेगाव ता. केज येथील सम्राट अशोक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो अभ्यासात हुशार होता.आज दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्याने घरात हे टोकाचे पाऊल उचलले. दुपारी घरी आल्यावर ही घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे बोबडेवाडी सह गोटेगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे, मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे. या टोकाच्या पावलामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
