धारूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील असोला येथे दिवसा ढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील असोला येथील परमेश्वर नारायण पांढरपोटे (वय ३५) हे शेतकरी व रिक्षाचालक असून ते ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत संशयित आरोपी रोहन रमेश चोले (रा. असोला) याने त्यांच्या राहत्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला.
घरातील कपाट उघडून त्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेला मुद्देमाल (एकूण ₹७१,०००):
- ७ ग्रॅम गंठण – ₹२०,०००
- ९ ग्रॅम झुमके – ₹३०,०००
- साडेतीन ग्रॅम ठुशी – ₹८,०००
- १ ग्रॅम वाळी – ₹२,०००
- १ ग्रॅम बदाम – ₹२,०००
- रोख रक्कम – ₹९,०००
या प्रकरणी परमेश्वर पांढरपोटे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पुरी हे करत आहेत.
